रेऊनगरमध्ये भर पावसाळ्यात पाण्याचा दुष्काळ. नगरपरिषदचे दुर्लक्ष; पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर शहरात मुसळधार पाऊस सुरू असतानाही रेऊनगर भागात पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. अमळनेर शहरातील ढेकूसिम रोडवरील विश्वकर्मा मंदिरासमोरील रेऊनगर येथील रहिवाशांना गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता. अखेर दहाव्या दिवशी पाणी आले असता, या भागातील नळांमध्ये पाणी पोहोचलेच नाही. वारंवार होणाऱ्या या समस्येमुळे संतप्त नागरिकांनी लक्ष्मीनगर पाण्याच्या टाकीवर ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला.

पावसाळ्यात तापी नदीला पुरेसे पाणी असताना देखील शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, अशी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. रेऊनगर ही शहरातील सर्वात जुनी कॉलनी असून येथील नागरिकांना अवेळी व अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे दररोज त्रास सहन करावा लागतो. या भागात नोकरदार वर्ग अधिक असून दुपारी पाणी आल्यास घरांमध्ये पाणी मिळत नाही, अशी समस्या नागरिकांनी मांडली.
पूर्वी अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करूनही नगरपालिकेकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. “जास्त वेळ पाणीपुरवठा करतो” असे सांगून समस्या मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. पण प्रत्यक्षात मोठ्या परिसराला जोडलेला एकाच व्हाॅल असल्याने शेवटच्या घरांपर्यंत पाणी पोहोचत नाही. गेल्या पंचवीस वर्षांपासून चार कॉलन्या एकाच व्हाॅलवर आहेत. वस्ती वाढली पण व्हाॅल वाढविण्यात आलेला नाही. त्यामुळे आता तातडीने नवीन व्हाॅल बसविण्यात यावा, अशी समस्त नागरिकांची मागणी आहे.
या आंदोलनात मच्छिंद्र बडगुजर, विलास बिरारी, दिपक ठोके, रवींद्र पाटील, विजय पाटील, तुकाराम धनगर, मिलिंद निकम, प्रमोद साळुंखे, प्रशांत काटकर, गणेश पाटील, सोनल पाटील, प्रतिभा पाटील, पुष्पा बडगुजर, विद्या साळुंखे, आशा ठोके, रेखा पाटील, शितल धनगर यांच्यासह अनेक रहिवाशांनी सहभाग घेतला.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76800/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1180/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
