वाढीव मालमत्ता करावर सन्मानजनक तोडगा – 10 टक्के लोकवर्गणी तात्काळ रद्द करा : खासदार स्मिता वाघ यांचे निर्देश..

0
New-Doc-07-18-2025-23.04.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : शहरातील वाढीव मालमत्ता करासंदर्भात निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर खासदार स्मिता उदय वाघ यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना सन्मानजनक तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, २०१२ पासून काही विशिष्ट कामांसाठी सुरू असलेली 10 टक्के लोकवर्गणी मुदतबाह्य झाल्याने ती तात्काळ थांबवावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या निवेदनानंतर १७ जुलै रोजी पालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी भाजप युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे, माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी, गोपी कासार, माजी नगरसेवक श्याम पाटील, निलेश भांडारकर यांसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार वाघ यांनी खाजगी संस्थेकडून सुरू असलेले सर्वेक्षण थांबवून पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच नवीन सर्वेक्षण करण्याचे, तसेच मालमत्ता हस्तांतरण मूल्य २% ने कमी करण्याचे निर्देश दिले. शासन दरबारी प्रस्ताव सादर केल्यास स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण विभागाच्या आढाव्यात पालिकेच्या शाळांची संख्या, शिक्षण कर, विद्यार्थ्यांची संख्या याबाबत चौकशी करून, इमारतींची दुरुस्ती व पायाभूत सुविधा वाढवून विद्यार्थी संख्या वाढवण्याचे आदेश दिले. पाणीपुरवठा योजनेत कर घेतल्यानंतर पाणी दोन दिवसाआड वेळेवर द्यावे, अशी सूचना केली. घरकुल योजनेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कौतुक करताना “कुणालाही वंचित ठेऊ नका, लाच मागितल्यास निलंबन होईल” असा इशारा दिला.

आरोग्य विभागाच्या आढाव्यात घंटागाडी नियमित न येणे, कचरा विलगीकरणातील त्रुटी, तसेच पालिका दवाखान्याबाबत माहिती घेतली. वीज बिल बचतीसाठी पालिका इमारत, अग्निशमन केंद्र व इतर ठिकाणी सौरऊर्जा यंत्रणा बसवून बचत झालेल्या निधीतून नागरी सुविधा वाढवण्याचा सल्ला दिला. काही अधिकाऱ्यांना कामात कुचराईबाबत ताकीदही देण्यात आली.

मुख्याधिकारी नेरकर यांनी सर्व प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे दिली. बैठकीस भाजप शहराध्यक्ष योगेश महाजन, हरचंद लांडगे, शितल देशमुख, उमेश वाल्हे, विजय राजपूत, राकेश पाटील, राहुल चौधरी, तसेच पत्रकार व पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार पत्रकार संघ अध्यक्ष चेतन राजपूत यांनी मानले.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 98500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74800/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1150/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed