साखरमुक्त शाळेचा आरोग्यदायी पुढाकार! श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलचा राज्यात पहिला अभिनव उपक्रम..

0
New-Doc-07-12-2025-23.53.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर: साखरेच्या अतिसेवनामुळे बालवयातच निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या रोखण्यासाठी श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलने एक अभिनव आणि आरोग्यदायी निर्णय घेतला आहे. या शाळेने स्वतःला “साखरमुक्त शाळा” म्हणून घोषित करून अमळनेर शहरात तसेच राज्यातही अशी घोषणा करणारी पहिली शाळा होण्याचा मान मिळवला आहे.

सध्याच्या काळात मुलांमध्ये चॉकलेट्स, जेली, केक यांसारख्या गोड पदार्थांचे प्रमाण अतिशय वाढले असून, त्यामुळे लहान वयातच लठ्ठपणा, दातांची समस्या, व बाल मधुमेह यांसारख्या व्याधी दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साखरमुक्ततेचा निर्णय घेतला.

या उपक्रमाअंतर्गत शाळेतील सर्व नोटीस बोर्ड विद्यार्थ्यांनी स्वतः सजवले असून आरोग्यदायी माहिती व सर्जनशील घोषवाक्यांनी शाळेचे वातावरण प्रेरणादायी बनवले आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम अधिक प्रभावी ठरला आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागाने ही संकल्पना केवळ नियम न राहता, एक आरोग्यदायी संस्कार घडवणारा उपक्रम बनली आहे.

या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शाळेत चॉकलेट, केक व फास्ट फूड आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी त्यांना शालेय ग्रंथालयासाठी पुस्तके, शाळेच्या बागेसाठी रोपे किंवा घरी बनवलेले आरोग्यदायी अन्न आणण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

प्राचार्य श्री. एल. लक्ष्मण म्हणाले,
“साखरेच्या अतिसेवनामुळे लहान मुलांमध्ये वाढते आजार दिसून येत आहेत. ही बाब लक्षात घेऊनच शाळेने साखरमुक्त शाळा उपक्रम सुरू केला असून यामध्ये पालक व विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे.”

शाळेचा हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर समाजात आरोग्यदायी जीवनशैलीबद्दल जागरूकता निर्माण करणारा एक आदर्श पाऊल ठरतो आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed