राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांचा अमळनेर दौरा; साने गुरुजी कर्मभूमी स्मारकावर उद्या भेट..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजित शिंदे हे सध्या खान्देश दौऱ्यावर असून, त्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने साने गुरुजी कर्मभूमी स्मारक, अमळनेर येथे उद्या दिनांक १३ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ वाजता भेट देणार आहेत.

स्मारक समितीच्या वतीने शिंदे सरांना कर्मभूमी स्मारकावर भेट देण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. त्यांनी सदर आमंत्रणाचा स्वीकार करून कर्मभूमी स्मारकास भेट देण्याचे निश्चित केले आहे. या भेटीदरम्यान स्मारकाचे अध्यक्ष प्राचार्य अ. गो. सराफ सर त्यांचे स्वागत व सत्कार करतील.
शिंदे सर स्मारकावर झालेल्या विविध कामकाजाचा आढावा घेणार असून, विशेष बाब म्हणजे त्यांच्या हस्ते व धुळे येथील सर्व राष्ट्रसेवकांच्या वतीने वडाच्या झाडाचे रोपण देखील करण्यात येणार आहे. वडाचे झाड हे दीर्घकाळ टिकणारे आणि भरपूर ऑक्सिजन देणारे असल्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून ही कृती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यक्रमासाठी स्मारकाचे कृतीशील सहकारी, हितचिंतक, पालक, पाठीराखे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
