अमळनेरमध्ये वेश्या व्यवसायाच्या विरोधात सर्वधर्मीय, सर्वपक्षीय मूक मोर्चा..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरात माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या 9 ऑक्टोबर 2024 च्या आदेशाची अंमलबजावणी करून वेश्या व्यवसाय त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरिकांनी मूक मोर्चा काढला. प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.
बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात
हा मूक मोर्चा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व पवित्र कुराण पठणाने सुरू झाला. दुपारी अडीच वाजता प्रारंभ झालेल्या या मोर्चात सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नेत्यांचे मार्गदर्शन व मागण्या
मोर्चाचे मुख्य समन्वयक व उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते रियाज शेख यांनी या आंदोलनाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर भागवत अण्णा गुरुजी, संदीप घोरपडे, सोमचंद सांधशिव, यशवंत बैसाणे, अरविंद बिऱ्हाडे, बाळासाहेब शिंदे, एड. अभिजीत बिऱ्हाडे, मनोज मोरे, काँग्रेसचे मनोज बापू, अझर खान (पाचोरा), एकता संघटनेचे फारुक शेख यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मत मांडले.
संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करून हा व्यवसाय बंद करावा, अन्यथा याच्या समर्थनार्थ असलेल्या राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रशासनाकडून निवेदन स्वीकृती
उपविभागीय दंडाधिकारी नितीन मुंडावरे व सहाय्यक पोलीस अधीक्षक केदार बारबोले यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. फारुक शेख यांनी निवेदनाचे वाचन करत प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी रियाज शेख, कुदरत अली सय्यद, यशवंत बैसाणे, मनोज बापू, अझहर शेख, मनोज मोरे, शेर खान पठाण, मुख्तार खाटीक, इमरान खाटीक आदींच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
मोर्चात हजारोंचा सहभाग
या मूक मोर्चात अमळनेर, जळगाव, पाचोरा आणि परिसरातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन वेश्या व्यवसायाच्या विरोधात आपल्या भूमिका स्पष्ट केली.
मोर्चाचा समारोप शांततापूर्ण पद्धतीने करण्यात आला. संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मोर्चेकऱ्यांची ठाम भूमिका होती.
