पासपोर्ट नियमांमध्ये मोठे बदल: जन्मदाखला अनिवार्य, पालकांची नावे हटवली..
24 प्राईम न्यूज 7 Mar 2025
केंद्र सरकारने पासपोर्ट नियम, 1980 मध्ये मोठे बदल केले असून, हे नवीन नियम अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर लागू होतील.
१ ऑक्टोबर २०२३ नंतर जन्मलेल्या व्यक्तींना जन्मदाखला अनिवार्य
नवीन नियमानुसार, १ ऑक्टोबर २०२३ नंतर जन्मलेल्या व्यक्तींना पासपोर्टसाठी जन्मदाखला देणे बंधनकारक असेल. हा दाखला महानगरपालिका किंवा जन्म-मृत्यू नोंदणी कायदा, १९६९ अंतर्गत अधिकृत प्राधिकरणाने जारी केलेला असावा. मात्र, १ ऑक्टोबर २०२३ पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना अन्य वैध कागदपत्रे जसे की एसएससी बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना इत्यादी स्वीकारले जातील.
पासपोर्टच्या शेवटच्या पानावरील पत्ता आणि पालकांची नावे हटवली
नवीन नियमानुसार, पासपोर्टच्या शेवटच्या पानावरून कायमचा पत्ता आणि पालकांची नावे हटवण्यात येणार आहेत. यामुळे एकल पालक आणि विभक्त कुटुंबांना दिलासा मिळेल. पत्याच्या माहितीसाठी बारकोड प्रणाली लागू केली जाईल, ज्यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांना बारकोड स्कॅन करून माहिती मिळवता येईल.
पासपोर्टचे कव्हर आता वेगवेगळ्या रंगांमध्ये
पासपोर्टच्या ओळखीला अधिक सोपे करण्यासाठी कलर कोडिंग प्रणाली लागू केली जाणार आहे:
सरकारी अधिकाऱ्यांसाठी – पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट
मुत्सद्दी अधिकाऱ्यांसाठी – लाल रंगाचा पासपोर्ट
सामान्य नागरिकांसाठी – निळ्या रंगाचा पासपोर्ट (जुने रंग कायम)
पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या वाढणार
देशभरात पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या ४४२ वरून ६०० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन अर्ज आणि सेवा प्रक्रिया अधिक सोपी व जलद होणार आहे.
नवीन नियमामुळे पासपोर्ट प्रक्रिया अधिक सुटसुटीत होणार असून, अर्जदारांसाठीही अनेक सुविधा निर्माण होतील.
