पारोळा येथील शहीद जवानाच्या कुटुंबाला खासदार स्मिता वाघ यांचे सांत्वन – जवानाच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च बोहरा सेंट्रल स्कूल उचलणार..
आबिद शेख/अमळनेर
देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या पारोळा येथील शहीद जवान जितेंद्र देविदास चौधरी यांच्या कुटुंबीयांना खासदार स्मिता वाघ यांनी भेट देऊन सांत्वन केले. या कठीण प्रसंगी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती त्यांनी बोहरा हायस्कूलचे चेअरमन सुरेंद्र भाऊ बोहरा यांना केली.
खासदार वाघ यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत सुरेंद्र भाऊ बोहरा यांनी जवानाच्या कन्येचे आठवीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण बोहरा सेंट्रल स्कूलतर्फे मोफत देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून, समाजाच्या सहकार्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी सुरेंद्र बोहरा, गोपाळ दाणेज, भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, शिवसेना शहराध्यक्ष अमृत चौधरी, अतुल पवार, सचिन गुजराथी, अतुल दादा पवार, धीरज महाजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार स्मिता वाघ यांनी शहीद जवानाच्या पत्नी व पालकांना धीर देत, “देशासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाच्या मागे संपूर्ण समाज उभा राहिला पाहिजे,” असे मत व्यक्त केले. त्यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि समाजासाठीच्या बांधिलकीमुळे सकारात्मक संदेश पसरला असून, शहीद जवानाच्या कुटुंबाला मिळालेल्या या आधारामुळे सामाजिक ऐक्य अधोरेखित झाले आहे.
