मणिपूरमध्ये तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा.
आदित्य ठाकरे यांची मागणी..
24 प्राईम न्यूज 21 Jul 2023
मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी असून तिथे तातडीने राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. –
विधान भवनाच्या आवारात आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मणिपूरबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराची घटना ७० दिवसांनंतर समोर आली आहे. हिंदुस्थानात महिलांना अशी वागणूक मिळायला नको, पण इतका अत्याचार झाल्यानंतरही केंद्र सरकार बोलत नाही. सरकारला लाज वाटली पाहिजे, असा हल्लाबोल करतानाच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घेऊन राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मणिपूरमध्ये असे असंख्य अत्याचार होत आहेत. दंगली, जाळपोळ सुरू आहे, पण तिथे इंटरनेट नसल्याने ते जगासमोर येत नाहीत. आपण इंडिया म्हणतो आणि तिथे इंटरनेट नाही, अशी खंतही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
