गैरसमजुतीच्या आधारे अटक केलेल्या मौलाना अंजर ची सुटका करा – जिल्हा शिष्टमंडळाची मागणी..
जळगाव (प्रतिनिधि)
भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाणे येथे मानवी तस्करी अंतर्गत भादवी ३७० प्रमाणे दाखल केलेल्या गुन्हयातील संशयित आरोपी मोहम्मद अंजर यांची क्रिमिनल प्रोसिजर कोड १६९ प्रमाणे त्वरित सुटका करा अशी मागणी लोहमार्ग पोलीस अधीक्षक गणेश शिंदे यांना जळगाव व भुसावळ येथील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून केली यावर सदर बाबत तपास सुरू असल्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असे शिंदे यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
तपासात पालकांचे स्पष्ट जबाब
भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी जी २९ बालके मौलाना अंजर यांच्याकडून ताब्यात घेतली होती त्या सर्व बालकांचे पालक हे स्वतःहून भुसावळ रेल्वे पोलिसांकडे हजर राहून त्यांनी आपले जबाब दिले की मौलाना मोहम्मद अंजर यांना आम्ही स्वेच्छेने व स्वतःहून मुलांना त्यांचा कडे सोपवले होते व सांगली, कराड व कोल्हापूर येथील मदरशा व शालेय शिक्षणासाठी त्यांना पाठवलेले होते. कोणत्याही प्रकारची बालमजुरी अथवा तस्करीसाठी मोहम्मद अंजर यांनी हे कृत्य केले नसून आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मुलांना घेऊन प्रवास करीत असल्याचे नमूद केले आहेत.
क्रिमिनल प्रोसिजर कोड १६९
यात अशी तरतूद आहे की जर पोलिसांकडे एखाद्या गुन्हेगार विरुद्ध पुरावा नसेल तर त्याला सोडून दिले जाईल मात्र तपास सुरू राहणार. पुढे असे सुद्धा नमूद आहे की तपास दरम्यान पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला दिसून आले की आरोपीला दंडाधिकार्याकडे पाठवण्याचे समर्थन करण्यासाठी पुरेसे पुरावे किंवा संशयाचे वाजवी कारण नाही तर तो अधिकारी संशयित आरोपीकडून बंधन पत्र करून त्याला सोडून देऊ शकतो व जेव्हा गरज भासेल तेव्हा त्याला तपास कामी पुन्हा बोलू शकतो अशी तरतूद आहे.
शिष्टमंडळात यांचा होता सहभाग
जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, जमियत उलमाचे अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मजहर पठाण, हुसेनी सेना अध्यक्ष फिरोज शेख, ईदगाह ट्रस्टचे सचिव अनिस शहा, वहिदत इस्लामीचे अध्यक्ष अतिक अहमद, ए यु फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, जळगाव शहर एम आय एम चे सईद शेख, प्रहार जिल्हाध्यक्ष भुसावळचे फिरोज शेख, मुस्लिम मंच भुसावळचे मुजाहिद शेख, युनूस शेख, वसीम शेख, आदींनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मागणी केली.
