अंतुर्ली-रंजाणे परिसरात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद! तांबेपुरा-अंतुर्ली रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला; नागरिकांनी टाकला सुटकेचा नि:श्वास.

अमळनेर : अंतुर्ली, रंजाणे आणि परिसरातील नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास तांबेपुरा ते अंतुर्ली रस्त्यावरील पिंजारी मुस्लिम स्मशानभूमीजवळ लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला. बिबट्या पकडला गेल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याचा परिसरात वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. बिबट्या सातत्याने आपले ठिकाण बदलत असल्यामुळे त्याला पकडणे वनविभागासाठी मोठे आव्हान ठरत होते. अखेर वनविभागाने योग्य ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात यश मिळवले.
वनपरिक्षेत्र अधिकारी छत्रपती चव्हाण, उपवनसंरक्षक राम धोत्रे आणि सहाय्यक वनसंरक्षक अमोल पंडित यांच्या सूचनेनुसार वनविभागाच्या पथकाने परिसरातील विविध मोक्याच्या ठिकाणी सापळे रचले होते. या मोहिमेला अखेर यश मिळाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, वनविभागाच्या या कारवाईमुळे संभाव्य धोका टळल्याची भावना व्यक्त होत आहे.

