जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान; ११ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात मुक्ताईनगर आणि चाळीसगाव मतदारसंघाकडे विशेष लक्ष; सोमवारी सकाळी ९ वाजेपासून मतमोजणी.

0

24 प्राईम न्यूज 29 Nov 2026.                                    जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज, रविवार २९ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांपैकी १० जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ११ जागांसाठी २९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

या निवडणुकीत मुक्ताईनगर आणि चाळीसगाव मतदारसंघ विशेष चर्चेत आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे निवडणूक लढवत असून, त्यांच्या विरोधात देवयानी देशमुख यांनी आव्हान उभे केले आहे.

तर चाळीसगाव मतदारसंघात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात नारायण नथ्थू पाटील आणि विजय भिकनराव पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील लढतीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

दरम्यान, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निकालातून जिल्हा बँकेच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होणार असल्याने राजकीय नेत्यांसह सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed