अमळनेरच्या सेवा संकल्प अभियानातून ९६० लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ! वयाच्या दाखल्यासाठी ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून द्यावी; माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांची अपेक्षा.
अमळनेरच्या/ आबिद शेख 
अमळनेर : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र आणि गरजू नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानाला अमळनेरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानांतर्गत विविध विभागांच्या माध्यमातून सुमारे ९६० लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. दरम्यान, जुन्या नोंदी उपलब्ध नसल्यामुळे अनेक नागरिकांना वयाचा दाखला मिळविताना अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन शासनाने ऑफलाइन पद्धतीने दाखले उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू करावी, अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील २५ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त १६ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून अमळनेर तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे संयुक्त सेवा संकल्प अभियान १६ ऑक्टोबर रोजी इंदिरा भुवन येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार डॉ. उमा ढेकळे, निवासी नायब तहसीलदार सी. यू. पाटील, तालुका कृषी अधिकारी सी. आर. ठाकरे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील, भूमिअभिलेख उपअधीक्षक सीमा गावित, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, नायब तहसीलदार अजय कुलकर्णी आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना शेख उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या की, प्रशासन जनतेच्या सेवेसाठी अधिक तत्पर झाले असून शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे पात्र नागरिक योजनांपासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी संबंधित प्रशासनाशी किंवा आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
विविध विभागांच्या योजनांचा लाभ
या अभियानात पुरवठा विभागामार्फत २२ नवीन शिधापत्रिका, ८ दुबार शिधापत्रिका आणि १८ शिधापत्रिकांमधून नावे कमी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच ५५० धान्य लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ६ लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले, तर ३५ नागरिकांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
सामाजिक अर्थसहाय्य योजनांमध्ये ८० हयात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ११०, इंदिरा गांधी योजनेअंतर्गत २२ आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत २४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
महसूल विभागामार्फत फेरफाराची १३४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. सातबारा दुरुस्तीची १४ प्रकरणे आणि आठ-अ उताऱ्याची ८ प्रकरणे पूर्ण करण्यात आली. तसेच ८४ लाभार्थ्यांना सातबारा उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय ४९ उत्पन्नाचे दाखले, १९ राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रे, ४१ रहिवासी प्रमाणपत्रे आणि १६ जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
आधार सेवेंतर्गत ८ नवीन आधार नोंदणी आणि ६ आधार दुरुस्तीची कामे करण्यात आली. बालविकास विभागामार्फत ५० लाभार्थ्यांना बेबी किटचे वाटप करण्यात आले. यासोबतच १२ विविध प्रकारचे खाद्य नमुने, ८ महिला बचत गटांना संबंधित लाभ, ४ लाभार्थ्यांना अवजारांचे वाटप आणि ४९ महिलांना शेतकरी प्रमाणपत्रे देण्यात आली.
वीज वितरण विभागामार्फत १० नागरिकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली. तसेच २६ लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड, ६० महिलांना मोफत प्रवास पास आणि २६ नागरिकांची बचत खाती उघडण्यात आली. आठ महिलांना सन्मान निधीचा लाभ देण्यात आला, तर एका लाभार्थ्याचे मुद्रांक शुल्कासंबंधी काम आणि १० लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
अशा प्रकारे विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून पात्र नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवांचा लाभ देण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात आला.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, कर्मचाऱ्यांचे सहकार्य
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संजय पाटील यांनी केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी मंडळाधिकारी नरेंद्रकुमार धनराळे, ग्राम महसूल अधिकारी अशपाक पिंजारी, जगदीश पाटील, विद्या पाटील, दीपक बोरसे, सूर्यवंशी आणि सचिन निकम यांनी सहकार्य केले.

