मातीसोबत खेळत लहानग्यांनी घेतला निर्मितीचा आनंद; ‘मूर्तिकार व्हा’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
अमळनेर/ आबिद शेख


अमळनेर : साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मूर्तिकार व्हा’ कार्यशाळेत लहान मुलांसह मोठ्यांनीही मातीसोबत खेळत निर्मितीचा अनोखा आनंद अनुभवला. गणपती बाप्पा मोरया…च्या जयघोषात बालकांनी उत्साहाने मातीच्या मूर्ती तयार करत सृजनशीलतेचा आनंद लुटला.

या कार्यशाळेत डॉ. लीना चौधरी यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मूर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन केले. मूर्तीकलेसोबतच त्यांनी श्रद्धा, कृतज्ञता आणि जिव्हाळा या जीवनमूल्यांचा अर्थही अत्यंत सोप्या शब्दांत उलगडून सांगितला.
यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देताना डॉ. चौधरी म्हणाल्या की, गणपती बाप्पासाठी पर्यावरणपूरक सजावट करावी. पर्यावरणाचे संवर्धन आणि संगोपन केले तरच खऱ्या अर्थाने बाप्पा प्रसन्न होतील. आपल्या श्रद्धेमुळे कोणालाही ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत असेल तर तो टाळणे हीदेखील आपली जबाबदारी आहे.

गणपती बाप्पा कोणताही भेदभाव न करता सर्वांनी एकोप्याने राहावे, असा संदेश देतात. हा एकतेचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
घरातील कुंडीतच गणपती बाप्पाचे विसर्जन करून त्या ठिकाणी सुगंधी फुलांचे रोप लावावे. त्या फुलांचा निर्मळ सुगंध जसा परिसरात दरवळतो, तसाच आपल्या कार्यात आणि चारित्र्यातही चांगुलपणाचा सुगंध दरवळत राहावा, असा सुंदर संदेश कार्यशाळेतून देण्यात आला.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अजय भिल, चेतन भोई, कल्पेश वाणी, दर्शना पवार, डॉ. अतुल चौधरी, गोपाळ नेवे, तुषार पाटील, शुभम पवार, राहुल पाटील, साक्षी सोनार, उमेश सोनार, डॉ. सचिन पाटील, डॉ. मिलिंद वैद्य, सतीश देशमुख, सचिन पाखले आणि मिनोती जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यशाळेच्या शेवटी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लहान-लहान बालकांनी मातीत खेळत निर्मितीचा मनमुराद आनंद घेतला.
तसेच आदरणीय प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्व सहभागींसाठी शेंगदाणा चिक्कीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे कार्यशाळेची सांगता आनंदी आणि संस्मरणीय वातावरणात झाली.

