अमळनेरची सुकन्या दियाना उर्फ अमृताची भारतीय संघात निवड; अंडर-१५ इनडोअर क्रिकेट वर्ल्डकपमध्ये चमकणार.- महाराष्ट्रातून भारतीय संघात निवड होणारी एकमेव खेळाडू; २१ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत रंगणार विश्वचषक.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : अमळनेरच्या क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली असून, येथील सुप्रसिद्ध उद्योजक आर. के. पटेल परिवारातील सुकन्या दियाना उर्फ अमृता हिची अंडर-१५ इनडोअर क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून भारतीय संघात स्थान मिळविणारी ती एकमेव खेळाडू असल्याने अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.


दक्षिण आफ्रिकेत २१ सप्टेंबरपासून अंडर-१५ इनडोअर क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार असून, या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अमृता भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
दियाना ही अमळनेर येथील मुंदडा ग्लोबल स्कूलची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आहे. ती स्वर्गीय उद्योजक आर. के. दादा पाटील यांची पणती असून उद्योजक विनोदभैय्या पाटील व वसंत बापू पाटील यांची नात आहे. तसेच ती मितेश पाटील व सौ. मोनाली मितेश पाटील यांची कन्या आहे.


गेल्या तीन वर्षांपासून अमृता क्रिकेटचा नियमित सराव करत असून, आपल्या मेहनतीच्या बळावर तिने उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली आहे. क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड स्पर्धेत राज्यभरातील अंडर-१५ गटातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अमृताने प्रभावी गोलंदाजी व दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. तिच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या अंडर-१५ इनडोअर क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारतीय संघात तिची निवड करण्यात आली.
यापूर्वीही अमृताने धुळे येथे झालेल्या अंडर-१९ बॉईज क्रिकेट सिरीजमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत **‘मॅन ऑफ द सिरीज’**चा बहुमान पटकावला होता. विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी करून तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
क्रिकेटमधील तिच्या यशामागे प्रशिक्षक मिलिंद शिंदे व रोनक शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. आगामी वर्ल्डकपच्या तयारीसाठी ती १० सप्टेंबरपासून बेंगळुरू येथे विशेष सराव शिबिरात सहभागी होणार असून, त्यानंतर भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे.
दरम्यान, तिच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच कॅबिनेट मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर येथे दियानाचे कौतुक करून तिला शुभेच्छा दिल्या व सत्कार केला. खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील तसेच मुंदडा ग्लोबल स्कूलचे चेअरमन ओमप्रकाश मुंदडा यांनी दियाना व तिच्या आई-वडिलांचे अभिनंदन केले आहे.
अमळनेरच्या या गुणी सुकन्येच्या भारतीय संघातील निवडीमुळे शहरासह परिसरात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करून अमृता देशाचे आणि अमळनेरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed