सुलेमान खान प्रकरणाला एक वर्ष पूर्ण; ‘न्याय अजूनही मिळाला नाही’ — एकता संघटन, जळगाव आक्रमक फरार आरोपींच्या तातडीच्या अटकेसह निष्पक्ष चौकशी, पीडित कुटुंबाला सुरक्षा व भरपाईची मागणी.
24 प्राईम न्यूज 11 Aug 2026

जळगाव : सुलेमान खान या २० वर्षीय तरुणाच्या मृत्यूच्या घटनेला ११ ऑगस्ट २०२६ रोजी एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, या प्रकरणात अद्याप न्याय मिळालेला नसल्याचा आरोप करत एकता संघटन, जळगाव यांच्या वतीने प्रशासन व संबंधित तपास यंत्रणेकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

११ ऑगस्ट २०२५ ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत एक वर्ष उलटूनही प्रकरणातील काही प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या प्रकरणात फरार आरोपींची तातडीने अटक करावी, सर्व आरोपींची निष्पक्ष चौकशी करावी आणि पीडित कुटुंबाला आवश्यक सुरक्षा व शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘मॉब लिंचिंगला धर्म नसतो, कायदाही भेदभाव करू नये’
सुलेमान खान यांच्या मृत्यूच्या घटनेबाबत एकता संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘मॉब लिंचिंग मजहब नहीं देखती, कानून भी नहीं देखेगा’ अशी भूमिका मांडत कोणत्याही प्रकारच्या जमावाच्या हिंसाचाराला कायद्याच्या चौकटीत कठोरपणे हाताळले पाहिजे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
न्यायप्रक्रियेबाबत संघटनेचे प्रश्न
या प्रकरणाच्या तपास व न्यायप्रक्रियेबाबत एकता संघटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये डिफॉल्ट बेलच्या प्रक्रियेत विलंब का होत आहे, धमकीच्या तक्रारीवर कारवाई का झाली नाही, फरार आरोपी अद्याप अटकेपासून दूर का आहेत, तसेच सर्व आरोपींच्या भूमिकेची चौकशी कधी पूर्ण होणार, असे सवाल करण्यात आले आहेत.
याशिवाय पीडित कुटुंबाला सुरक्षा आणि मुआवजा कधी मिळणार, तसेच जमावाच्या हिंसाचाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी कुठपर्यंत झाली, याबाबतही संघटनेने प्रशासनाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
एकता संघटनेच्या प्रमुख मागण्या
एकता संघटन, जळगाव यांच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत—
▶ फरार आरोपीची तातडीने अटक करावी.
▶ धमकी देणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी.
▶ सर्व आरोपींची निष्पक्ष चौकशी करावी.
▶ पीडित कुटुंबाला सुरक्षा व योग्य मुआवजा द्यावा.
▶ सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करावी.
▶ प्रकरणाचा तपास व न्यायप्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा.
‘इन्साफ चाहिए, भीख नहीं!’
प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘इन्साफ चाहिए, भीख नहीं — सुलेमान को न्याय दो’ असा नारा देत एकता संघटनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अन्यायाविरोधातील लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला असून, कायद्याच्या चौकटीत राहून सुलेमान खान प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
‘न्यायात विलंब म्हणजे न्याय नाकारण्यासारखे आहे; सुलेमानला न्याय मिळालाच पाहिजे,’ अशी भूमिका एकता संघटन, जळगावच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

