नंदगावसह चार गावांच्या शिवारात बिबट्याची दहशत; शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : तालुक्यातील नंदगाव, रंजाणे, आंबारे आणि खापरखेडा परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत वन विभाग व प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला नंदगाव परिसरात उमेश पारथी यांच्या गाय व वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील पशुपालकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नंदगाव, रंजाणे, आंबारे, खापरखेडा तसेच घुबड्या नाला आणि रंजाणे रस्त्यालगतच्या शिवारात बिबट्याचा वावर आढळून येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकरी दिवसा तसेच रात्रीच्या वेळी शेतातील कामांसाठी जात असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाळीव जनावरांवर हल्ल्याचा धोका असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
निवेदनातून संबंधित वन, महसूल व कृषी विभागाने चारही गावांच्या शिवाराची तातडीने पाहणी करून आवश्यक पंचनामा करावा, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाची गस्त वाढवावी, प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात तसेच शेतकरी व शेतमजुरांना बिबट्यापासून बचावासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच बिबट्यामुळे पशुधनाचे नुकसान झाल्यास तातडीने सर्वेक्षण करून नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, परिसरात आवश्यक सुरक्षा उपाय उपलब्ध करून द्यावेत आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे.
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली असून, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

