अतिवृष्टीचा अमळनेरच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम; मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने अनेक भागांत ८ ते १० दिवस उशिराने पाणीपुरवठा.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर: अमळनेर शहरात ३० जुलैच्या रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा मोठा फटका नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. बोरी नदीपात्रातील ५०० मिमी व्यासाची मुख्य सीआय (C.I.) जलवाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शहरातील अनेक भागांतील पाणीपुरवठा पुढील ८ ते १० दिवस उशिराने होणार असल्याची माहिती अमळनेर नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे.

अतिवृष्टीमुळे गांधली येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसर तसेच मुख्य पंपिंग मशिन्सजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कोणताही तांत्रिक धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य पंपिंग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे. साचलेल्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर मशिन्सची तपासणी, दुरुस्ती व सुरक्षिततेची खात्री करूनच पाणी उपसा पुन्हा सुरू केला जाणार आहे.
दरम्यान, बोरी नदीवरील पुलाखाली असलेली ५०० मिमी मुख्य जलवाहिनी पुराच्या तीव्र प्रवाहात वाहून गेली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे व पुनर्बांधणीचे काम प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतले असून शक्य तितक्या लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुख्य जलवाहिनीचे नुकसान झाल्यामुळे कोर्ट जलकुंभ, झामी चौक, लालबाग जलकुंभ, बोरी पंप हाऊस, तांबेपुरा आणि रामवाडी जलकुंभ या भागांतील पाणीपुरवठा पुढील ८ ते १० दिवस उशिराने होणार आहे. तसेच पैलाड, मुंदडा नगर आणि लक्ष्मीनगर जलकुंभ या भागांव्यतिरिक्त उर्वरित शहरातही पुढील सुमारे १० दिवस पाणीपुरवठा उशिराने होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना उपलब्ध पिण्याच्या पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल अमळनेर नगरपरिषद प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे सांगितले आहे.
ही माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, पाणीपुरवठा विभागाचे सभापती कैलास नामदेवराव पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पाणीपुरवठा अभियंते सत्यम पाटील आणि प्रवीणकुमार बैसाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
