संत सखाराम महाराज मंदिर, बोरी नदी परिसरात कचऱ्याचे ढीग; मॉर्निंग वॉकसह भाविकांना त्रास.

0

अमळनेर | आबिद शेख 


अमळनेर शहरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संत सखाराम महाराज मंदिर व बोरी नदी परिसरातील रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या परिसरातून दररोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणारे नागरिक तसेच मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना कचऱ्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे.


रस्त्याच्या कडेला तसेच परिसरात कचरा साचल्याने दुर्गंधी पसरत असून, अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळच्या वेळी व्यायाम व मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना कचऱ्याच्या ढिगांमधून मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही या अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.


शहरातील कचऱ्याच्या समस्येबाबत यापूर्वी नगरपालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदने देऊन तसेच विविध ठिकाणचे फोटो प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही काही भागांमध्ये कचऱ्याचे ढीग कायम असल्याने नगरपालिका स्वच्छता व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नगरपालिका प्रशासनाकडून शहर कचराकुंडीमुक्त करण्यात आल्याचे आणि घंटागाड्यांमार्फत कचरा संकलनाची व्यवस्था सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यावरच कचरा साचत असल्याने ही व्यवस्था नेमकी कुठे कमी पडत आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
संत सखाराम महाराज मंदिर व बोरी नदी परिसर हा नागरिक आणि भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असल्याने येथे तातडीने स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे. निवेदने, तक्रारी आणि फोटो देऊनही जर कचऱ्याचे ढीग कायम राहणार असतील, तर अमळनेर शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा थेट सवाल आता अमळनेरकरांकडून केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed