प्रताप पॅटर्नमध्ये जेईई, नीट व एमएचटी-सीईटी २०२६ मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : प्रताप पॅटर्न मार्फत व्हीए क्वांटम इन्स्टिट्यूटतर्फे सन २०२६ मध्ये जेईई, नीट व एमएचटी-सीईटी या प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश अमळनेर शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांना स्पर्धा परीक्षांविषयी जागरूक करणे तसेच विद्यार्थ्यांना उच्च ध्येय निश्चित करून यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरित करणे हा होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नीरज अग्रवाल (कार्याध्यक्ष, खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर) तसेच श्री जितेंद्र मोहनलाल जैन (कार्य उपाध्यक्ष, खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर) होते. यावेळी श्री हरी भीका वाणी (संचालक, खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर), प्रा. डॉ. एच. डी. जाधव (प्राचार्य, प्रताप महाविद्यालय, अमळनेर), प्रा. ए. के. अग्रवाल (उपप्राचार्य), सौ. माधुरी प्रमोद पाटील (उपाध्यक्ष, खानदेश शिक्षण मंडळ), सौ. लीना प्रवीण पाटील (संचालिका, खानदेश शिक्षण मंडळ), श्री कमल कोचर (उपाध्यक्ष, खानदेश शिक्षण मंडळ), सौ. वसुंधरा लांग्रे (विश्वस्त, खानदेश शिक्षण मंडळ), प्रा. पराग पाटील (चितणीस, खानदेश शिक्षण मंडळ), श्री अमोल मानके तसेच श्री वसंत पाटील (समन्वयक, प्रताप पॅटर्न) उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी सर्व मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रताप पॅटर्नचे संचालक विक्रांत कुमार यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रताप पॅटर्नची माजी विद्यार्थिनी राजनंदिनी यादव हिने केले.
या कार्यक्रमाला प्रताप पॅटर्न व प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सन २०२६ मधील जेईई, नीट व एमएचटी-सीईटी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या ३० विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांचा सत्कार होताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रताप पॅटर्नचे संचालक विक्रांत कुमार म्हणाले की, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी केवळ पाठांतर पुरेसे नसते, तर विषयातील मूलभूत संकल्पना सखोलपणे समजून घेणे अत्यंत आवश्यक असते. विज्ञान हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीत विज्ञान दडलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषय समजून घेऊन अभ्यास करण्याची सवय लावावी तसेच नियमित अभ्यास, शिस्त आणि सातत्यपूर्ण सराव यांना आपल्या जीवनाचा भाग बनवावा.
ते पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जेईई किंवा नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीमध्ये चांगले यश मिळत नाही, असा चुकीचा समज पसरविला जात आहे. हा समज पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. योग्य मार्गदर्शन, नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर विद्यार्थी जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी या तिन्ही परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थी आणि पालकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता योग्य मार्गदर्शनाखाली तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रसंगी सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन, शिस्तबद्ध दिनचर्या आणि पालकांच्या मोलाच्या सहकार्याला दिले. विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी अनुभव ऐकून उपस्थित विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रेरित झाले. अनेक विद्यार्थ्यांनी पुढील वर्षी याच व्यासपीठावर सन्मानित होण्याचा आणि स्वतःचे यशोगाथा सांगण्याचा निर्धार व्यक्त केला.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा सत्कार सोहळा केवळ यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करणारा कार्यक्रम न ठरता, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा, जागृती आणि आत्मविश्वास निर्माण करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.
