‘मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती’; अमळनेरात रविवारी शाडू माती गणपती कार्यशाळा जयनिल फाउंडेशन तर्फे आयोजन.
अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी जयनिल फाउंडेशन, अमळनेर यांच्या वतीने तालुकास्तरीय शाडू माती गणपती कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती’ हा संदेश देत विद्यार्थ्यांसह नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण या उपक्रमातून दिले जाणार आहे.

पीओपीच्या गणेशमूर्तींमुळे विसर्जनानंतर जलप्रदूषणाची समस्या निर्माण होते. त्याला पर्याय म्हणून शाडू मातीच्या मूर्तींचा वापर वाढविणे आणि लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

दोन गटांत होणार स्पर्धा
स्पर्धेसाठी बाल गट (इयत्ता १ ली ते ७ वी) आणि खुला गट (वयाची अट नाही) असे दोन गट करण्यात आले आहेत. दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांकास ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकास १ हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी व प्रशिक्षणार्थीस प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
जयनिल फाउंडेशनच्या अध्यक्ष गौतम जयश्री अनिल पाटील आणि उपाध्यक्ष वरुण राजश्री राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणणाऱ्या या उपक्रमात अमळनेर तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि गणेशभक्तांनी आपल्या मुलांसह सहभागी व्हावे, असे आवाहन जयनिल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

