इनोमरेशन फॉर्म भरला नाही तर मतदार यादीत नाव येणार नाही.– प्रांत मयूर भंगाळे.-अमळनेरमध्ये युवा कल्याण प्रतिष्ठानचा एसआयआर नोंदणी उपक्रम; सुमारे ५०० नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

अमळनेर/आबिद शेख.

                                 अमळनेर : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष व सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेला नागरिकांचा सक्रिय प्रतिसाद मिळावा आणि बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांचे काम सुलभ व्हावे, या उद्देशाने युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ८ मध्ये दोन केंद्रांवर एसआयआर नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.


संत सखाराम महाराज नगर ओपन प्लेस आणि साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ, रामबाग कॉलनी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू असलेल्या या उपक्रमात प्रभाग क्रमांक ६, ७ व ८ मधील नागरिकांना माहितीपत्रके वितरित करून केंद्रावर येण्याचे आवाहन करण्यात आले होते. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सुमारे ५०० नागरिकांनी इन्युमरेशन (Enumeration) फॉर्म भरून दिले.
एकाच ठिकाणी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार तसेच संबंधित बीएलओ यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे बीएलओ यांनाही मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पार पाडता आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी दोन्ही केंद्रांना भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व उपक्रमाचे कौतुक केले.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी बीएलओ अजय भामरे, धर्मा धनगर, चिंतामण धनके, शिवाजी मोरे, दत्तू कोळी, विकास पाटील, ज्ञानेश्वर भदाणे आणि दिनेश साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच किरण शिसोदे, अशोक बिऱ्हाडे, पत्रकार संजय पाटील, मुन्ना पवार, मिलिंद मोरे, गोसावी आबा, आनंद पवार, सुनील बाविस्कर आदींचे सहकार्य लाभले.
प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांसाठी दि. २६ जुलै २०२६ रोजी संत सखाराम महाराज नगर ओपन प्लेस येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत एसआयआर नोंदणीची सुविधा पुन्हा उपलब्ध राहणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सहभागातून अशा स्वरूपाचा एसआयआर नोंदणी उपक्रम राबविणारी युवा कल्याण प्रतिष्ठान ही आगळीवेगळी संस्था असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed