प्रताप महाविद्यालयात १६ व १७ सप्टेंबरला राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा पूज्य साने गुरुजींच्या विचारांवर आधारित स्पर्धा; विजेत्यांना आकर्षक पारितोषिकांसह चषक.

0

अमळनेर/आबिद शेख

Oplus_131072

अमळनेर, प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन १६ व १७ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दोन दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाच्या CCMC विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय चौधरी यांनी दिली.

Oplus_131072

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी साहित्य व कला, भारताचा इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान व आरोग्य, महाराष्ट्रातील समाजसुधारक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, भारतीय अर्थव्यवस्था, क्रीडा, पर्यावरण, राज्यव्यवस्था व शासन, वाणिज्य, माहितीचा अधिकार, विज्ञान व तंत्रज्ञान, मानव संसाधन विकास व मानवी हक्क, चालू घडामोडी, कृषी, पूज्य साने गुरुजी तसेच अन्य समाजसुधारक अशा विविध ज्ञानशाखांचा समावेश असलेला व्यापक अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे.स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाबरोबरच विविध विषयांवरील आकलन, तर्कशक्ती, चिकित्सक विचार आणि तत्परतेचीही कसोटी लागणार आहे. स्पर्धेच्या तीन फेऱ्या होणार असून पहिल्या फेरीत सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील. दुसऱ्या फेरीत ऑडिओ-व्हिडिओ प्रश्नांची बझर फेरी होईल. तिसऱ्या व अंतिम फेरीत पूज्य साने गुरुजी आणि अन्य समाजसुधारकांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.

विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघास १० हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकास २ हजार रुपये व चषक, तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकास १ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील या स्पर्धेचे समन्वयक डॉ. किरण गावित, तर सह-समन्वयक प्रा. भाग्यश्री जाधव आहेत. पूज्य साने गुरुजी यांच्या विचारांचा, साहित्याचा आणि सामाजिक कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये व्यापक वाचनाची सवय, सामाजिक भान आणि विविध विषयांचे ज्ञान विकसित व्हावे, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
खानदेश शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळाने स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षाचे समन्वयक डॉ. मुकेश भोळे, CCMC विभागाचे माजी समन्वयक डॉ. विजय तुंटे, सध्याचे CCMC समन्वयक डॉ. धनंजय चौधरी आणि सह-समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे सदस्य नियोजनबद्ध पद्धतीने परिश्रम घेत असून महाराष्ट्रातील महाविद्यालयांकडून या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed