‘झाडे लावून जगविण्याचा संकल्प’ : जयनिल फाउंडेशनचे अमळनेरमध्ये वृक्षसंवर्धन अभियान.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत जयनिल फाउंडेशनच्या वतीने अमळनेर शहरात उत्साहात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान राबविण्यात आले. केवळ झाडे लावण्यापेक्षा ती जगविण्यावर भर देत फाउंडेशनने यंदाच्या पावसाळ्यात शहर अधिक हिरवेगार करण्याचा संकल्प केला आहे.

शहरात पर्यावरणाचा समतोल राखणे, प्रदूषण कमी करणे आणि भावी पिढीला स्वच्छ व निरोगी वातावरण मिळावे या उद्देशाने शेकडो वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी जयनिल फाउंडेशनने स्वीकारली आहे. प्रत्येक झाडाला ट्री गार्ड, वेळोवेळी खत, आवश्यकतेनुसार पाणी आणि नियमित देखरेख करून ती मोठी होईपर्यंत जपली जाणार आहेत.
जयनिल फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील आणि उपाध्यक्ष वरुण राजेश पाटील यांनी सांगितले की, “वृक्षारोपण ही केवळ सुरुवात आहे. खरे पर्यावरण संवर्धन तेव्हाच शक्य होईल, जेव्हा प्रत्येक लावलेले झाड जिवंत राहील. त्यामुळे आमचा भर वृक्षलागवडीसोबत वृक्षसंवर्धनावर आहे.”
यावेळी त्यांनी नागरिकांना प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. “आज जपलेले प्रत्येक झाड उद्याच्या पिढीसाठी अमूल्य ठेवा ठरेल,” असेही त्यांनी नमूद केले.
या अभियानात पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, नरेंद्र चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील, आरिफ मेवाती, किरण पाटील, दर्शन पाटील, वेद पाटील, टिल्लू पाटील, प्रशांत पाटील, किशोर महाजन, योगेश राजपूत, वरद कासार, अभिषेक भदाणे, मेहुल चौधरी, राहुल पाटील, भूषण पाटील, भूषण लोहार, विशाल पाटील, पियुष पाटील यांच्यासह जयनिल फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
जयनिल फाउंडेशनच्या या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत असून, “वृक्षारोपणापेक्षा वृक्षसंवर्धन अधिक महत्त्वाचे” हा संदेश देणारा हा उपक्रम इतर सामाजिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
