धुळे रोडवरील स्वामी समर्थ गेट परिसरात वाहतूक कोंडी; कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलिस नियुक्तीची नागरिकांची मागणी.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरातील धुळे रोडवरील स्वामी समर्थ गेट परिसरात वाहतूक पोलिसांची नियमित व्यवस्था नसल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याची समस्या समोर येत आहे. विशेषतः शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेत या परिसरात विद्यार्थी, पालक आणि वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर शाळकरी विद्यार्थ्यांची सतत ये-जा असते. त्यातच रस्त्यावर वाढती वाहतूक आणि नियंत्रणासाठी ट्रॅफिक पोलिसांची अनुपस्थिती यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेकदा वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी प्रशासनाकडे या परिसरात कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच गर्दीच्या वेळेत वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, जेणेकरून विद्यार्थी व नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
