मुंदडा नगरातील पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिक संतप्त, मनमानी कारभारावर आरोप.
अमळनेर : आबिद शेख
शहरातील मुंदडा नगर-१ भागातील पाण्याच्या टाकीवरून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र भावना व्यक्त केली आहे. या समस्येमुळे प्रभाग क्रमांक १५, १६, १७ आणि १८ मधील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सदर भागात नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाच व्हॉल्वमन नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र त्यांच्यात समन्वय नसल्यामुळे पाणी वितरणाचे नियोजन कोलमडल्याचा आरोप होत आहे. काही भागात सहा ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असून काही भागात अकरा ते बारा दिवस उलटूनही नळ कोरडे असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.


नागरिकांच्या म्हणण्यानुसार, व्हॉल्वमन यांच्या मनमानी कारभारामुळे काही निवडक भागात पाणीपुरवठा होत असून इतर भागांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जबाबदार लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी हे केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित राहिले आहेत का, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
वॉर्डमधील नगरसेवकांच्या सूचनांनाही पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी गांभीर्याने घेत नसल्याचे बोलले जात आहे.
यंत्रणा कुचकामी, अधिकारी सुस्त?
“उशाशी पाणी आणि घसा कोरडा” अशी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना दहा ते बारा दिवस पाणी साठवून ठेवून वापरावे लागत आहे. त्याच पाण्याचा पिण्यासाठी वापर केल्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
कोट – निलीमा विश्वनाथ पाटील (नगरसेविका, वॉर्ड क्र. १६)
“सध्यस्थितीत मुंदडा नगर-१ येथील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नेमलेल्या व्हॉल्वमनमध्ये समन्वय नाही. वारंवार सूचना करूनही नागरिकांना उद्धट वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे.”
कोट – नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर
“शहरातील विविध भागांतून अनियमित पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. काही ठिकाणी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार आढळून आला असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.”
