धावडे ग्रामपंचायतीचा बेकायदेशीर वाळू वाहतुकीविरोधात एल्गार तहसिलदारांकडे कारवाईची मागणी, संगनमताचा आरोप.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यातील धावडे ग्रामपंचायतीने गाव हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसा आणि चोरट्या वाहतुकीविरोधात तहसिलदारांकडे तक्रार दाखल करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

ग्रामपंचायतीचे सरपंच तथा प्रशासक डॉ. उमाकांत भास्कर पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धावडे गाव हद्दीतील वाळू घाटाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांकडून मागील महिनाभरापासून दिवस-रात्र बोटी आणि जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. तसेच डंपरद्वारे बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक सुरू असून शासनाचा महसूल बुडवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत १८ मे २०२६ रोजी तहसिल कार्यालयात लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र चार दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे ग्रामपंचायतीने म्हटले आहे. उलट संबंधित वाळू माफियांना प्रशासनाचे अभय असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
“प्रशासनाने वाळूचोरांशी संगनमत न ठेवता तातडीने कडक कारवाई करावी. अन्यथा प्रशासन आणि वाळू माफियांमध्ये संगनमत असल्याचा संशय अधिक बळावेल,” असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
