गलवाडे रोडवरील रस्त्याची दयनीय अवस्था; साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा आक्रोश.. आमदारांनी पाहणीची मागणी..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान यांनी लोकसहभागातून गलवाडे रोड परिसरात तब्बल १३ एकर जागा खरेदी करून त्या ठिकाणी हजारो झाडांची लागवड केली आहे. मुरमाड व ओसाड जमिनीत हरित नंदनवन फुलवण्याचा स्तुत्य प्रयत्न या संस्थेकडून सुरू आहे. मात्र, या चांगल्या उपक्रमास रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे मोठा अडथळा निर्माण होत आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत झाडांना पाणी देण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. परंतु, गलवाडे रोड ते प्रतिष्ठानच्या जागेकडे जाणारा रस्ता अत्यंत खडतर आणि धोकादायक असल्याने अनेक टँकर चालक येण्यास नकार देत आहेत. परिणामी, झाडांचे संगोपन करणे कठीण बनले असून संस्थेच्या कार्यकर्त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, ये-जा करताना शेतकरी व नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागतात. अनेक वेळा लहान-मोठे अपघातही घडत असून, पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते. चिखल, खड्डे आणि निसरडा रस्ता यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची वेळ येते.

त्यामुळे आजच आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हा.
या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार अनिल भाईदास पाटील यांनी स्वतः घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी प्रतिष्ठान व परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
“झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. मात्र, मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे आमचे प्रयत्न व्यर्थ जात आहेत. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न सोडवावा,” अशी भावना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या या उपक्रमाला योग्य पायाभूत सुविधा मिळाल्यास हा परिसर खऱ्या अर्थाने हिरवागार नंदनवन बनेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
