अमळनेरमध्ये 19 मार्चला ‘भूमी सुपोषण चळवळी’चा राष्ट्रीय शुभारंभ; तयारीसाठी प्रशासकीय मेगा बैठक. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन; सर्व विभागांना युद्धपातळीवर तयारीचे निर्देश..

0
New-Doc-03-14-2026-06.39.jpg


अमळनेर/ आबिद शेख
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात गुरुवार, दि. 19 मार्च रोजी केंद्रीय कृषीमंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘भूमी सुपोषण चळवळी’चा राष्ट्रीय शुभारंभ होणार आहे.

अक्षय कृषी परिवार व मंगळ ग्रह सेवा संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्याच्या यशस्वी आयोजनासाठी शुक्रवार, दि. 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मंगळग्रह मंदिरात सुमारे दोन तासांची प्रशासकीय मेगा बैठक पार पडली.


बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, पोलीस उपअधीक्षक विनायक कोते, जिल्हा कृषी अधीक्षक के. एन. तडवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, बीडीओ एन. आर. पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी सी. डी. साठे, कृषी विभागाचे उपसंचालक भरत इंगळे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता टी. एच. नेमाडे, उपकार्यकारी अभियंता नितीन चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, निवासी नायब तहसीलदार सी. यू. पाटील, नायब तहसीलदार ए. पी. कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मंदिराच्या अभिषेकगृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत भूमी सुपोषण चळवळीच्या प्रचार-प्रसारासाठी आवश्यक सूचना दिल्या.


यावेळी बोलताना जिल्हाधिकारी घुगे म्हणाले की, देशातील कृषी क्षेत्रासाठी ही चळवळ अत्यंत उपयुक्त असून ती खऱ्या अर्थाने लोकचळवळ आहे. प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वय साधून या उपक्रमाला अधिक प्रभावी बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. अमळनेरकडे येणारे व बाहेर जाणारे सर्व रस्ते तपासून रस्त्यांवरील समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. सती माता मंदिराजवळील बोगदा व रस्त्याच्या समस्येबाबतही युद्धपातळीवर मार्ग काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सुरक्षिततेसाठी अग्निशामक दल, ॲम्बुलन्स व पुरेसे पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी कृषी क्षेत्रातील सर्व घटकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून त्याची उपयुक्तता पटवून देण्याचे आवाहन केले.
मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा स्पष्ट केली. 19 मार्च रोजी होणारा कार्यक्रम देशातील सर्व कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये तसेच देशातील सुमारे 600 जिल्ह्यांमध्ये थेट प्रक्षेपित केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित अधिकाऱ्यांनी कार्यक्रम स्थळ, पार्किंग व्यवस्था, व्हीआयपी पार्किंग, प्रवेश-निर्गम मार्ग, स्वच्छतागृहे व रस्ते आदी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक कविता पवार-नेरकर यांनीही मंदिर व कार्यक्रम स्थळाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत आवश्यक सूचना दिल्या.
चौकट : दर्शन व सत्कार
जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रोहन घुगे यांनी प्रथमच श्री मंगळग्रह मंदिराला भेट दिली. यावेळी डॉ. डिगंबर महाले यांनी मंदिराचा इतिहास व महत्त्व सांगितले. मंदिरात रोहन घुगे व मीनल करणवाल यांनी विधिवत पूजाही केली. मंदिरातर्फे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम आणि मंगल सेवेकरी प्रकाश मेखा यांनी त्यांचा सत्कार केला.
चौकट : अमळनेरचीच निवड का?
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात दाक्षिणात्य शैलीतील भूमीमातेची विश्वातील एकमेव मूर्ती आहे. तसेच भूमीपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री मंगळग्रहाची स्वयंभू मूर्तीही येथे आहे. या स्थानमहात्म्यामुळेच भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभासाठी अमळनेरची निवड करण्यात आली आहे.
चौकट : 19 मार्चचे वैशिष्ट्य
19 मार्च रोजी वर्षप्रतिपदा असून हा दिवस भूमीमातेचा जन्मदिवस मानला जातो. त्याच दिवशी हिंदू नववर्षारंभ आणि गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. त्यामुळेच या दिवशी भूमी सुपोषण चळवळीचा राष्ट्रीय शुभारंभ करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed