स्वावलंबनाचा अनोखा धडा : जैतपीर शाळेत विद्यार्थिनींकडून पारंपरिक चुलीवर भाकरी तयार..

0
New-Doc-02-22-2026-22.28.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने जैतपीर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी इयत्ता चौथी ते सातवीतील विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारात पारंपरिक चुलीवर भाकरी तयार करून स्वावलंबनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
“अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक असतो” या उक्तीला साजेसा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. आधुनिक काळात गॅस, शेगडी व विविध साधनांचा वापर वाढत असताना पारंपरिक पद्धती जपण्याचा आणि स्वावलंबनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.
उपक्रमाची सुरुवात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी स्वतः चूल मांडण्यापासून झाली. मुख्याध्यापक व शिक्षकांनीही विद्यार्थिनींसोबत भाकरी तयार करण्याचा अनुभव घेत सहभाग नोंदवला. त्यामुळे सुरुवातीला संकोचलेल्या विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या उपक्रमातून विद्यार्थिनींना श्रमाचे महत्त्व, समूहभावना, स्वावलंबन आणि सहकार्याची शिकवण मिळाली. विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांनीही भाकरी तयार करण्यात मदत करत स्त्री-पुरुष समानतेचा सकारात्मक संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी गरमागरम भाकरीसोबत हिरव्या मिरचीचा ठेचा यांचा आस्वाद घेतला. स्थानिक पातळीवर तयार केलेल्या शुद्ध शेंगतेलामुळे भोजनाची चव अधिक खुलली.
हा उपक्रम केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांना जीवन जगण्याचे कौशल्य शिकवणारा ठरला. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून जीवन घडवणारे केंद्र आहे, हे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed