६६ कोटींच्या भुयारी गटार योजनेचा बोजवारा; गलवाडे रोडवर ड्रेनेज ओव्हरफ्लोमुळे दूषित पाण्याचे तळे, नागरिक त्रस्त..
अमळनेर /आबिद शेख
अमळनेर शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सुमारे ६६ कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येत असलेली भुयारी गटार योजना तब्बल नऊ वर्षांपासून संथगतीने सुरू असल्याने या योजनेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. ठिकठिकाणी ड्रेनेज चोकअपच्या घटनांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून दुर्गंधी, अस्वच्छता व आरोग्याच्या प्रश्नांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
शहरातील मुख्य व वर्दळीचा रस्ता असलेल्या गलवाडे रोडवरील प्रमुख पेट्रोल पंपासमोर भुयारी गटार योजनेचे चेंबर मागील महिन्याभरापासून चोकअप झाले आहे. या चेंबरमधील दूषित पाणी रस्त्याच्या कडेला साचून राहिले असून त्यामुळे रस्त्यालगत मोठे दूषित पाण्याचे तळे तयार झाले आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची ये-जा सुरू असते.
पालिकेने या भागातील रहिवाशांच्या सोयीसाठी भुयारी गटार योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन टाकली होती. मात्र सध्या या लाईनची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. भुयारी गटारचे चेंबर फुटले असून त्यातील घाण पाणी रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या मैदानात साचत आहे. विशेष म्हणजे, या मैदानाच्या शेजारीच ग्लोबल व्ह्यू इंग्लिश मीडियम स्कूल असल्याने या परिसरातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी, पालक तसेच रस्त्याने प्रवास करणारे नागरिक यांना या शेवाळयुक्त, दूषित पाण्यामुळे तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व अमळनेर पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, संबंधित ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करून दूषित पाण्याचा निचरा करण्यात यावा, तसेच भुयारी गटार योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 161000
22 Ct सोने 91.60% : ₹. 148100
18 Ct सोने 75.00% : ₹. 122300
शुद्ध चांदी 999%:₹. 2980/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
