याआधी ट्रक, आता डंपर! गांधलीपुरा चौकीजवळील रस्ता अपघातांना आमंत्रण. प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप.

0
New-Doc-01-12-2026-07.42.jpg


अमळनेर | आबिद शेख
गांधीपुरा पोलीस चौकीजवळील रस्त्यावर खडीने भरलेला डंपर अचानक मोठ्या खड्ड्यात फसल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
सदर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच ठिकाणी यापूर्वीही एक ट्रक फसल्याची घटना घडली होती. तरी देखील संबंधित विभागांनी कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासन मोठी जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, या मार्गावरून दररोज शाळेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. जर ही घटना शाळेच्या वेळेत घडली असती, तर गंभीर दुर्घटना घडू शकली असती. त्यामुळे या रस्त्यावरील धोका अधिकच वाढला आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. निधी नेमका कुठे खर्च होतो, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर तातडीने कठोर कारवाई करावी तसेच सदर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही, याची खात्री करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed