शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी जाहीर; समर्थकांत जल्लोष!
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर :- आगामी नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच अमळनेर शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. समर्थकांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला तर सोशल मीडियावर अभिनंदन संदेशांचा अक्षरशः वर्षाव सुरू झाला आहे.

जितेंद्र ठाकूर हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, क्रीडा, नागरी प्रश्न आणि नागरिकाभिमुख उपक्रमांमध्ये सातत्याने कार्यरत आहेत. शहरातील समस्यांची अचूक जाण, नागरिकांशी थेट संवाद, तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना जोडून घेण्याची क्षमता या त्यांच्या कार्यशैलीमुळे ते एक सक्षम, प्रभावी आणि प्रबळ उमेदवार म्हणून पाहिले जात होते.
त्यांच्या नावापर्यंत एकमताने शिक्कामोर्तब होताच “योग्य उमेदवाराची निवड” झाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले. अनेकांनी आजच गुलाल टाकून स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.
नेतृत्वाचे आभार व अभिनंदन…
शहर विकास आघाडीने प्रबळ आणि लोकमान्य उमेदवाराला संधी दिल्याबद्दल कार्यकर्ते आणि नागरिकांनी आमदार अनिलदादा पाटील, खासदार स्मिताताई वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील आणि माजी नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
नेतृत्वाचा हा निर्णय शहराच्या प्रगतीचा मार्ग अधिक भक्कम करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आघाडीने सक्षम उमेदवार जाहीर करताच नगरपरिषद निवडणुकीतील समीकरणांना नवीन वळण मिळाले असून प्रतिस्पर्ध्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरात “एकतर्फी लढतीचे” संकेत नागरिक देत असून, ठाकूर यांच्या उमेदवारीमुळे आघाडीला नवचैतन्य लाभल्याचे स्पष्ट दिसत आहे.
नागरिकांमध्ये “शहर विकासाच्या दिशेने सकारात्मक बदल” होण्याची अपेक्षा अधिक वाढली आहे.
