मका उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय; गावरानी जागल्या सेनेची बाजार समितीकडे नोंदवहीची मागणी..

0
New-Doc-10-30-2025-21.56.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर :मका उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या प्रतीक्विंटल ₹२४०० या किमान आधारभूत दराऐवजी ₹१२०० ते ₹१६०० इतकाच दर दिला जात असल्याचा आरोप करत गावरानी जागल्या सेना या संघटनेने अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लेखी विनंती केली आहे.

संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक विश्वासराव विठाबाई भास्करराव पाटील कापडणे (नीती) यांनी दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सादर केलेल्या या विनंतीपत्रात शेतकऱ्यांच्या मका शेतमालातील आर्द्रतेनुसार अन्यायकारक भाव दिला जात असल्याचे नमूद केले आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, शासन नियमानुसार १२ टक्के आर्द्रतेसाठी ₹२४०० हा आधारभूत दर ठरवण्यात आला आहे. मात्र अमळनेर बाजार समितीत प्रत्यक्षात २५ ते ३५ टक्के आर्द्रता असलेल्या मका शेतमालास ₹१२०० ते ₹१५०० असा दर दिला जात असून, शेतकऱ्यांवर प्रती क्विंटल ₹५०० ते ₹७०० इतकी आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात विश्वासराव पाटील यांनी बाजार समितीकडे मागणी केली आहे की,
२४ ऑक्टोबर २०२५ नंतर विक्रीस आलेल्या मका शेतमालासंदर्भातील — शेतकऱ्याचे नाव, पत्ता, फोन क्रमांक, आर्द्रतेचे प्रमाण, तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे, मिळालेला दर व वजन — यांची दैनंदिन नोंदवहीची छायांकित प्रत गावरानी जागल्या सेना या संघटनेस उपलब्ध करून द्यावी.

तसेच जर बाजार समितीकडून कोणतीही कारवाई झाली नाही, तर शेतकरी हितासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली जाणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

पत्राची प्रत आमदार अनिल पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed