शालेय फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यास अडथळा करू नका — नाशिक विभागीय मंडळाचा कडक इशारा!
24 प्राईम न्यूज 30 Oct 2025

नाशिक (प्रतिनिधी) :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळाने (नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांसाठी) सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

अनेक स्वयंअर्थसहाय्यीत, इंग्रजी माध्यम तसेच अनुदानित आणि विनाअनुदानीत शाळांमधून विद्यार्थ्यांनी शालेय फी न भरल्याचे कारण देत इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे २०२६ सालच्या बोर्ड परीक्षेचे आवेदनपत्र भरले जात नसल्याच्या तक्रारी विभागीय मंडळाकडे प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय काही शाळांकडून विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट व गुणपत्रक थांबविण्याचे प्रकारही यापूर्वी आढळले आहेत.

या पार्श्वभूमीवर विभागीय सचिव एम. एस. देशले यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की,
“कोणत्याही विद्यार्थ्याला शालेय फी न भरल्याचे कारण देऊन परीक्षेपासून वंचित ठेवू नये. अशी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळेविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.”
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अबाधित ठेवणे ही प्रत्येक शाळेची जबाबदारी असल्याचेही मंडळाने अधोरेखित केले आहे.
📞 संपर्क: 0253-2950410 / 2945241 / 2945251
📧 Email: nsksec@rediffmail.com

