अमळनेरात भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा; सामाजिक भवन उभारणीचे आश्वासन..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथे भटके विमुक्त जातींच्या सामाजिक प्रतिनिधींनी एकत्रित येऊन भटके विमुक्त दिवस नांदेडकर सभागृहात सामाजिक चिंतन कार्यक्रमातून उत्साहात साजरा केला. वासुदेव जोशी गोंधळी समाज पंचमंडळ अमळनेर तर्फे आयोजित या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. जि.प. सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील उपस्थित होत्या.
अध्यक्षीय भाषणात सौ. जयश्री पाटील यांनी आ. अनिल दादा पाटील यांच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यात भटके विमुक्त सामाजिक भवन निर्माण करून देऊ असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, संत सेवालाल महाराज, संत भिमा भोई, स्व. वसंतराव नाईक व स्वातंत्र सैनिक सुपडू जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांनी शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे महत्व सांगितले. तर सौ. वसुंधरा लांडगे यांनी भटके विमुक्त समाजाने सामाजिक पातळीवर संघटित होण्याची गरज अधोरेखित केली. सामाजिक कार्यकर्ते बन्सीलाल भागवत यांनी “एकत्र येणे ही सुरुवात असून भविष्यातील सामाजिक प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतील” असे मत व्यक्त केले. तर सुनिल भोई यांनी पुढील वर्षी हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे जाहीर केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक व समाजाचे अध्यक्ष विलास दोरकर, उपाध्यक्ष नारायण शिंदे यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. मंचावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संदीप भोई, रतिलाल भोपे, रणजित शिंदे, सौ. वसुंधरा लांडगे, बन्सीलाल भागवत, सौ. सीमा भोपे आदी मान्यवरांसह प्रमुख सामाजिक कार्यकर्ते व विविध समाज घटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले. प्रास्ताविक विलास दोरकर यांनी तर आभार प्रदर्शन नारायण शिंदे यांनी केले.
