टाकाऊ लाकडांपासून आकर्षक वस्तू : ग्रामीण रुग्णालय धानोरा यांचा अनोखा उपक्रम.
24 प्राईम न्यूज 17 Aug 2025
धानोरा : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे एक आगळावेगळा व स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रीती पटले यांच्या संकल्पनेतून “टाकाऊतून टिकाऊ” हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला.
मागील महिन्यात वादळामुळे रुग्णालय परिसरातील एक जुने झाड पडले होते. या झाडाच्या टाकाऊ लाकडांचा पुनर्वापर करून खुर्च्या, स्टूल तसेच इतर आकर्षक व उपयुक्त शोभेच्या वस्तू तयार करण्यात आल्या. यामुळे केवळ कचरा कमी झाला नाही तर पर्यावरणावर होणारा ताणही मोठ्या प्रमाणात कमी झाला.
उपक्रमाचे प्रमुख फायदे :
- पर्यावरणाची काळजी : कचरा कमी होऊन नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर.
- आर्थिक बचत : नवीन वस्तू खरेदी करण्याचा खर्च वाचतो.
- रोजगार निर्मिती : स्थानिक कारागिरांना कामाच्या संधी. सर्जनशीलता : नवनवीन गोष्टी तयार करण्यास प्रेरणा.
या उपक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे आणि डॉ. नरेश पाडवी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मा. मिताली शेट्टी मॅडम यांनी प्रोत्साहन दिले. शुभांगी बाविस्कर, दीपक वाघमारे, दिनू वळवी व जगदीश चौधरी यांनी विशेष परिश्रम घेऊन या उपक्रमाला यश मिळवून दिले.
हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच आर्थिक बचतीचे उत्तम उदाहरण ठरत असून ग्रामीण भागातील संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
