लक्ष्मी नगरातील रस्त्यातील खड्डा ठरणार जीवघेणा? पाण्याच्या टाकीशेजारी घाण साचल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका!
आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर ढेकु रोड लक्ष्मी नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ गेल्या १० ते १५ दिवसांपासून रस्त्यामध्ये खोल खड्डा खोदलेला असून, तो अजूनही खुलाच आहे. या खड्ड्याकडे ना नगरपालिका प्रशासनाचे लक्ष आहे ना कुठल्याही अधिकाऱ्याचे.
या खड्ड्यात कुत्र्याची पिल्ले, डुकरांची पिल्ले पडत असून, त्याच खड्ड्यातून साचलेले घाणेरडे पाणी थेट नागरिकांच्या पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका आहे.

स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही नगरपरिषदेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे एकीकडे नागरिक संतप्त आहेत, तर दुसरीकडे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर संकट निर्माण झाले आहे.
तत्काळ या खड्ड्याची डागडुजी करून सुरक्षित झाकण लावावे, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइनची स्वच्छता करावी.
