२६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा एनआयए कोठडीत; १८ दिवस कसून चौकशी होणार
24 प्राईम न्यूज 12 April 2025
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही सुनावणी बंद दाराआड पार पडली. एनआयएने त्याच्या चौकशीसाठी २० दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने १८ दिवसांचा निर्णय दिला.
राणाला गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता अमेरिकेहून आणण्यात आले. त्याचे गल्फस्ट्रीम G550 खासगी विमान दिल्लीच्या पालम तांत्रिक विमानतळावर उतरले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला थेट एनआयएच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल असून तो लष्कर-ए-तैयबा, हरकत-उल-जिहादी इस्लामी यांसारख्या संघटनांशी संबंधित आहे.
एनआयए व रॉचे संयुक्त पथक राणाची इन-कॅमेरा चौकशी करणार आहे. चौकशीदरम्यान १७ वर्षांपूर्वीच्या दहशतवादी कारवायांसंदर्भातील अनेक गूढ प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. राणाचा जबाब पूर्णपणे रेकॉर्ड केला जाणार आहे.
राजकीय श्रेयावरून संघर्ष
तहब्बूर राणाचे प्रत्यार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचे यश असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. त्यानंतर मोदींचे गुजरात मुख्यमंत्री असतानाचे एक जुने वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये त्यांनी अमेरिकेतील न्यायालयाच्या निर्णयावरून तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका केली होती.
दरम्यान, काँग्रेसने या प्रत्यार्पणाचे श्रेय यूपीए सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या प्रक्रियेला दिले आहे. त्यामुळे आता या घटनेभोवती राजकीय श्रेयाची जोरदार लढाई सुरू झाली आहे.
