तौसीफ बेग मिर्झा क्रिकेट स्पर्धेतून करत आहेत धडाकेबाज कामगिरी… -इतर राज्यांमध्येही भुसावळचा डंका; ISPL T-10 खेळण्याचे स्वप्न
24 प्राईम न्यूज 11 Apri 2025
भुसावळ खडका रोडवरील ग्रीन पार्क येथील रहिवासी तौसीफ बेग मिर्झा यांनी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. परिश्रम व समर्पणाच्या बळावर त्यांनी फक्त जळगाव जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात ‘छक्क्यांचा बादशाह’ म्हणून आपली छाप पाडली आहे. आता त्यांचे स्वप्न ISPL T-10 स्पर्धा खेळण्याचे आहे.

डावखुरा हा हरहुन्नरी फलंदाज नुकत्याच पुण्यात सिंहगड भागात झालेल्या ‘प्रहार प्रीमियर लीग’च्या उपांत्य फेरीत तुफानी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी केवळ 20 चेंडूत 78 धावा ठोकल्या, ज्यात 11 छक्क्यांचा समावेश होता आणि त्यातील 7 छक्के सलग होते.
वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल यांना आदर्श मानणाऱ्या तौसीफ मिर्झाची ओळख आता खानदेश व विदर्भातही प्रस्थापित झाली आहे. तिथे होणाऱ्या अनेक स्पर्धांसाठी त्यांना निमंत्रण येते. त्यांची आक्रमक फलंदाजी पाहून अनेक गोलंदाज त्यांच्या समोर येण्यास घाबरतात.
मामामुळे डावखुरा फलंदाज बनला
तौसीफ म्हणतात की, अमळनेरमध्ये राहणाऱ्या त्यांचे मामा मुना शेख (पत्रकार) यांनी त्यांच्या लहानपणातच त्यांच्यातील कौशल्य ओळखले आणि डावखुरा फलंदाज बनण्याची प्रेरणा दिली. फलंदाजीबरोबरच ते मध्यमगती गोलंदाजीही करतात.
साधारण कुटुंब, पण मोठी स्वप्नं
तौसीफ यांचे वडील ऑटो रिक्षा चालवतात. अशा साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या तौसीफला जर प्रशिक्षक, क्रिकेटप्रेमी, प्रायोजक आणि तज्ज्ञ यांच्याकडून योग्य साथ मिळाली, तर तो दिवस दूर नाही, जेव्हा ते ISPL T-10 स्पर्धेत खेळताना दिसतील.
ISPL साठी जोरदार तयारी
ही स्पर्धा खेळण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते दिवस-रात्र मेहनत करत आहेत. “जर मला ISPL मध्ये खेळण्याची संधी मिळाली, तर ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी उपलब्धी ठरेल. त्यामुळे केवळ जळगाव जिल्हाच नव्हे, तर महाराष्ट्राचेही नाव उज्ज्वल होईल,” असे ते आत्मविश्वासाने सांगतात.
