अमळनेरात २५० तरुणांना पोलीस भरतीचे धडे; जिल्हा पोलीस दलाच्या उपक्रमाचे खासदार स्मिता वाघ यांच्याकडून कौतुक पोलीस भरतीची प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणेकडूनच प्रशिक्षण मिळाल्याने उमेदवारांना अचूक मार्गदर्शन – आमदार अनिल पाटील.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना पोलीस दलात भरती होण्याची संधी मिळावी, तसेच भरती प्रक्रियेतील नियम, अटी आणि आवश्यक बाबींची योग्य माहिती मिळावी, या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे अमळनेर येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे २५० तरुणांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून प्रताप महाविद्यालयातील राणे सभागृहात हे प्रशिक्षण शिबिर पार पडले. यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी जिल्हा पोलीस दलाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, अशा प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील होतकरू तरुणांच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल.
भरती प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होऊन खऱ्या अर्थाने पात्र उमेदवारांना त्यांच्या परिश्रमाचे फळ मिळेल. जळगाव जिल्हा पोलीस दलाचा हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरणारा आहे.
आमदार अनिल पाटील यांनीही या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रिया राबविणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच उमेदवारांना प्रशिक्षण मिळत असल्याने त्यांच्याकडून होणाऱ्या चुका टाळता येतील. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे आपल्याच जिल्ह्यातील असल्याने त्यांनी तरुणांसाठी विशेष पुढाकार घेतला,
ही अभिमानाची बाब आहे. उमेदवारांना सरावासाठी खान्देश शिक्षण मंडळाच्या माध्यमातून तसेच स्वतःच्या प्रयत्नांतून क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अनेक उमेदवार भरतीची वेळ जवळ आल्यानंतर तयारी सुरू करतात. त्यामुळे त्यांना नियम, कागदपत्रे आणि परीक्षेच्या स्वरूपाबाबत गोंधळ निर्माण होतो. मात्र, अशा प्रशिक्षणामुळे उमेदवारांना भरती प्रक्रियेची पूर्वकल्पना मिळेल आणि ते शारीरिक तसेच लेखी परीक्षेसाठी योग्य नियोजन करून सज्ज होतील. सर्वसामान्य कुटुंबातील अधिकाधिक तरुणांना पोलीस दलात नोकरीची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशिक्षणादरम्यान जिल्हा पोलीस दलातील सुनील निकम, विजय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर सैय्यद, मेघना जोशी, प्रियांका टिकारे, रज्जाक सैय्यद, संदीप पाटील, किरण सपकाळे, विजय कोळी आणि दिग्विजय दाभाडे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. कागदपत्रांची पूर्तता, शारीरिक क्षमता, लेखी परीक्षा, मैदानी चाचणी आणि पात्रतेचे निकष याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष मैदानावर सरावाचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले.
यावेळी खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन नीरज अग्रवाल, जितेंद्र जैन, योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, हरी भिका वाणी आणि डीवायएसपी विनायक कोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डीवायएसपी विनायक कोते यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीआय गणेश अहिरे, साजिद मन्सूरी, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, शरद काकळीज, धनराज कोळी, नामदेव बोरकर, कविता ठाणगे, हेडकॉन्स्टेबल प्रशांत पाटील, नितीन कापडणे, सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, नाना धनगर तसेच खान्देश शिक्षण मंडळाने सहकार्य केले.
या शिबिरामुळे पोलीस भरतीतील बारकावे, संभाव्य अडचणी आणि आवश्यक कागदपत्रांबाबत अचूक माहिती मिळाल्याने सहभागी तरुणांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील तरुणांसाठी हे प्रशिक्षण दिशादर्शक ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

