अमळनेरमध्ये पत्रकाराला धमकी दिल्याचा आरोप; संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाईची मागणी मोटारसायकल अडवून चावी काढली, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख; सार्वजनिक ठिकाणी बदनामी केल्याचाही दावा.

0

अमळनेर/आबीद शेख
अमळनेर : अमळनेर शहरात पत्रकाराला अडवून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा, तसेच सार्वजनिक ठिकाणी बदनामी केल्याचा आरोप समोर आला आहे. याप्रकरणी ‘द लोक न्यूज’ या वेब पोर्टलचे मुख्य संपादक संभाजी सुकलाल देवरे यांनी महेंद्र शालीग्राम बोरसे यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

देवरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ६ ते ६.३० वाजेदरम्यान ते मोटारसायकलने जात असताना न्यू प्लॉट परिसरात बजरंग बन्सीलाल अग्रवाल यांच्या घरासमोर त्यांचा रस्ता अडविण्यात आला. यावेळी मोटारसायकलची चावी काढून घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीने शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि अंगावर धावून येत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
‘खंडणीखोर पत्रकार’ संबोधून बदनामी केल्याचा दावा
घटनेदरम्यान आपल्याला सार्वजनिक ठिकाणी ‘खंडणीखोर पत्रकार’ असे संबोधण्यात आले. तसेच सोबत असलेल्या एका व्यक्तीला संभाषणाचे चित्रीकरण करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप देवरे यांनी केला आहे. या प्रसंगी घटनास्थळी सुमारे ३० ते ४० लोकांची गर्दी जमली होती, असेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे आपली सार्वजनिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
विविध कायदेशीर तरतुदींनुसार कारवाईची मागणी
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम १२७(२), ३५१(२), १५२ आणि ३५६(२), तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी प्रतिबंध) अधिनियम, २०१७ मधील कलम ३ व ४ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
देवरे यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. तक्रारीची प्रत जळगावचे पोलीस अधीक्षक आणि अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणातील आरोप तक्रारदाराने केलेले असून, त्यांची स्वतंत्र पडताळणी किंवा पोलिसांच्या कारवाईबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतर पुढील बाबी स्पष्ट होऊ शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed