निर्माल्यामुळे कृत्रिम तलावाची दुरवस्था; पालिकेचे बॅनरही तलावात! नागरिक निर्माल्य टाकत असताना कर्मचारी नेमके करत होते काय? पडदे फाटले, साहित्याचीही दुर्दशा; पालिका प्रशासनाच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह.

0

अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने अमळनेर नगर परिषदेतर्फे तेल्या देव परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावाची विसर्जनानंतर अक्षरशः दुरवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. तलावात मोठ्या प्रमाणात निर्माल्य साचले असून, नागरिकांच्या सोयीसाठी लावण्यात आलेले नगर परिषदेचे बॅनरही थेट तलावात पडले आहेत. आडोशासाठी लावण्यात आलेल्या पडद्यांचीही अवस्था खराब झाली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने कृत्रिम तलावासह मंडप, आडोसे, पडदे, बॅनर आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. तलावाच्या देखरेखीसाठी संबंधित मुकादम व कर्मचाऱ्यांच्या ड्युट्याही लावण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांकडून निर्माल्य तलावात टाकले जात असताना त्यांना रोखण्यासाठी किंवा स्वतंत्र निर्माल्य संकलन व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचारी कितपत सक्रिय होते, असा सवाल उपस्थित होत आहे.


प्रशासनाचा खर्च, नियोजन कागदावर आणि देखरेख मात्र गायब?
नागरिकांसाठी सुविधा उभारल्यानंतर त्यांची देखभाल करणे ही पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. तलाव परिसरात निर्माल्य साचू नये, बॅनर व पडदे खराब होऊ नयेत आणि विसर्जनाची व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी ड्युटीवरील कर्मचाऱ्यांनी नियमित पाहणी करणे अपेक्षित होते. मात्र, तलावाची सध्याची अवस्था पाहता देखरेख व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांकडून निर्माल्य टाकले जाणे ही एक बाजू असली, तरी त्यांना रोखण्यासाठी किंवा योग्य ठिकाणी निर्माल्य जमा करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची यंत्रणा कुठे होती, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पालिकेने सुविधा उभारल्या, कर्मचारी नियुक्त केले; मग त्यांच्यावर देखरेख ठेवणारे अधिकारी कुठे होते? असा संतप्त प्रश्नही उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed