ताडेपुराच्या हक्कावर घाला? ‘नमो गार्डन’ दुसरीकडे नेल्याने नागरिक संतप्त.पैलाड, शनीपेठ, सिंधी कॉलनी, ताडेपुरातील नागरिक आक्रमक; “जाब विचारल्याशिवाय राहणार नाही!” — नगरसेविका शोभाबाई गढरे.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर  : ताडेपुरा परिसराच्या विकासासाठी प्रस्तावित करण्यात आलेले ‘नमो गार्डन’ मध्यवर्ती शहरात नेऊन त्याचे भूमिपूजन करण्यात आल्याने ताडेपुरासह पैलाड, शनीपेठ, सिंधी कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परिसराच्या हक्काचा विकास निधी व विकासकामे दुसरीकडे वळविल्याचा आरोप करत नागरिकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे.


ताडेपुरा येथे गार्डन उभारण्याच्या निर्णयाला सुरुवातीपासूनच सत्ताधाऱ्यांकडून विरोध करण्यात आला होता. मात्र, प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका शोभाबाई गढरे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष दुर्गेश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी ताडेपुराच्या विकासासाठी सातत्याने आवाज उठविला होता.


दरम्यान, ताडेपुरासाठी प्रस्तावित असलेले ‘नमो गार्डन’ आता मध्यवर्ती शहरात नेण्यात आल्याने नागरिकांनी या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “ताडेपुराचा विकास पळवून तो मध्यवर्ती शहरात नेण्याचा निर्णय नेमका कुणी घेतला?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ताडेपुरा, पैलाड, शनीपेठ व सिंधी कॉलनी परिसरात अद्यापही अनेक मूलभूत सुविधांची आवश्यकता असताना विकासकामे इतरत्र वळविणे अन्यायकारक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“ताडेपुराच्या विकासाच्या प्रश्नावर आम्ही गप्प बसणार नाही. ‘नमो गार्डन’चा निर्णय कसा बदलला, याचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा नगरसेविका शोभाबाई गढरे यांनी दिला.
यामुळे ‘नमो गार्डन’चा मुद्दा आता राजकीय आणि नागरिकांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता असून, आगामी काळात या निर्णयाविरोधात नागरिकांची भूमिका अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed