पावसाने पाठ फिरवली; अमळनेर-पारोळा दुष्काळाच्या छायेत! पिके करपण्याच्या मार्गावर; तातडीने पंचनामे करून कोरडा दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्याची आमदार अनिल पाटील यांची मागणी.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अमळनेर आणि पारोळा तालुक्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती निर्माण झाली आहे.


खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बँका, पतसंस्था तसेच विविध वित्तीय संस्थांकडून पीककर्ज घेतले आहे. बियाणे, खते, औषधे, मशागत आणि इतर खर्चासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक केल्यानंतर आता पावसाने दगा दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादनाची अनिश्चितता आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.


या गंभीर परिस्थितीची तातडीने शासनाने दखल घ्यावी, यासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी शासनातील वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन अमळनेर व पारोळा तालुक्यांतील पावसाची आणि पिकांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांना निवेदन
आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन देत अमळनेर व पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले.
तातडीने पंचनामे करण्याची मागणी
पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करावेत, तसेच अमळनेर आणि पारोळा तालुक्यांना कोरडा दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार अनिल पाटील यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीक नुकसानभरपाई, आवश्यक शासकीय सवलती तसेच विविध योजनांचा लाभ तातडीने मिळावा, यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
“शेतकरी संकटात असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच आपली प्राथमिकता आहे,” अशी भूमिका घेत आमदार अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. आता शासन या मागणीवर कोणता निर्णय घेते, याकडे अमळनेर व पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed