अमळनेर तालुक्यात सुका दुष्काळ जाहीर करा; पीक विम्याचे धोरण स्पष्ट करा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीसह बोरी नदीला आलेल्या महापुरामुळे अमळनेर तालुक्यातील अनेक शेतांमध्ये पाणी साचून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून सरसकट पंचनामे न करता अर्धवट पंचनामे करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे.


यानंतर १ ऑगस्टपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील उरलेली पिकेही उन्हामुळे सुकू लागली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यात तातडीने आणेवारी काढून सुका दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या मागणीसंदर्भात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाने सरसकट मदत द्यावी, तसेच अतिवृष्टी व त्यानंतरच्या पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच पीक विम्याबाबत शासनाचे धोरण स्पष्ट जाहीर करावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

पीक विम्याच्या निकषांमध्ये केलेल्या कपातीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून, शासन कोणत्या धोरणानुसार पीक विमा मंजूर करणार आहे, हे स्पष्ट करावे. याबाबतची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून कृषिमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करावे, अशी विनंती संघटनेने तहसीलदारांकडे केली आहे.
शेतकऱ्यांना तातडीने दिलासा न मिळाल्यास त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed