टाकरखेड्यात एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली मृत्यू; परिसरात शोककळा.
अमळनेर /आबिद शेख

अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. सुनील अमृत भिल (वय २७), त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल (वय २५) आणि त्यांची मुले सनी (वय ८) व दास (वय ४) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भिल कुटुंबातील चौघे पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यानंतर दानापूरकडून वलसाडकडे जाणाऱ्या ०९०२६ क्रमांकाच्या रेल्वेखाली आल्याने चौघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाकडून पहाटे सुमारे ४.४० वाजता पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, कौटुंबिक कारणाची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, कारणाबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

