चुकीला माफी नाही; अन्न सुरक्षा नियम मोडणाऱ्यांवर कारवाई अटळ. तुकाराम मुंढे.
24 प्राईम न्यूज 27 Aug 2026

राज्यातील १२ कोटींहून अधिक नागरिकांच्या आरोग्याशी अन्न व औषध प्रशासनाचा थेट संबंध आहे. त्यामुळे अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
फाईव्ह स्टार हॉटेल असो किंवा रस्त्यावरील स्ट्रीट फूड विक्रेता, प्रत्येकाला अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कोणताही दबाव न घेता कठोर कारवाई केली जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांना आतापर्यंत ७०० हून अधिक नोटिसा बजावण्यात आल्या असून, सुमारे १०० आस्थापनांनी या कारवाईविरोधात अपील केले आहे. मात्र कारवाई करताना संबंधित व्यक्ती प्रभावशाली आहे की मोठा व्यावसायिक आहे किंवा त्याला राजकीय पाठबळ आहे, याचा विचार केला जात नसल्याचे मुंढे यांनी सांगितले. कायदा सर्वांसाठी समान असून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘हे आमचेच उंदीर आहेत’ म्हणणाऱ्या विक्रेत्याला इशारा
तपासणीदरम्यान काही धक्कादायक प्रकार समोर आल्याचेही मुंढे यांनी सांगितले. एका खाद्यविक्रेत्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उंदरांचा वावर आढळून आला. त्यावर संबंधित मालकाने ‘हे आमचेच उंदीर आहेत’, असे उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारची कारणे प्रशासन स्वीकारणार नसून, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
महाप्रसाद, भंडाऱ्यांनाही अन्न सुरक्षा नियम लागू.
गणेशोत्सवाच्या काळात मंडळांकडून आयोजित करण्यात येणारा महाप्रसाद आणि भंडाऱ्यांनाही अन्न सुरक्षा नियम लागू राहतील. आवश्यक परवाने घेणे, स्वच्छता राखणे आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सणासुदीच्या काळात मिठाई विक्रेत्यांवर नजर.
सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई आणि खाद्यपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी नव्या नियमावलीसंदर्भातील सूचना जारी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
शाळा, अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची तपासणी
शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचीही तपासणी सुरू आहे. मुंबईतील विविध केंद्रांची पाहणी करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन आढळलेल्या एका केंद्राचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
तसेच शाळांच्या ५० मीटर परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक खाद्यपदार्थांच्या विक्रीवर असलेल्या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचेही अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

