साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण.
अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात राज्यस्तरीय पुरस्कारांचे उत्साहात वितरण करण्यात आले. यंदाचा साथी गुलाबराव पाटील स्मृती राजकीय पुरस्कार जनता दलाचे नेते तथा मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांना, तर सामाजिक (पुरोगामी) पुरस्कार माजी आयआरएस अधिकारी व जलसंवर्धन तज्ज्ञ उज्वलकुमार चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २१ व २२ ऑगस्ट रोजी या समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. लाल टोपी, बागायतदार रुमाल, २१ हजार रुपये रोख व ‘शिंगाडेधारी गुलाबराव पाटील’ स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

विद्यार्थ्यांनी विवेकातून परिवर्तन घडवावे : शमिभा पाटील
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारलिंगी समाजाच्या अभ्यासक शमिभा पाटील होत्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सोशल मीडियावरील प्रत्येक संदेशाची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले. संदर्भासाठी ग्रंथालयाचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपली वैचारिक बैठक मजबूत करावी. लोकशाही टिकवून ठेवण्याची जबाबदारी ‘जेन-झी’वर असून विद्यार्थ्यांनी विवेकाच्या माध्यमातून परिवर्तन घडवावे, असे त्यांनी सांगितले.
द्वेषापेक्षा संवाद, अफवांपेक्षा सत्याची पडताळणी, व्यक्तीपूजेपेक्षा विचार आणि विभाजनापेक्षा बंधुत्वाला महत्त्व देण्याचे आवाहनही त्यांनी केले. संविधानाच्या प्रास्ताविकेतील मूल्ये आत्मसात केल्यास संविधानाला अभिप्रेत समाजनिर्मिती शक्य होईल, असेही त्या म्हणाल्या.
जलसंवर्धनासाठी माणसे उभी करणे हीच प्रेरणा : उज्वलकुमार चव्हाण
सत्कारमूर्ती उज्वलकुमार चव्हाण यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान देणारी माणसे घडवली, हे त्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील २३८ गावांमध्ये जलक्रांती घडवून आणली असून गावात पाण्यासाठी झटणारी माणसे तयार करणे हीच आपली प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाची सवय लावून घ्यावी, जीवनमूल्यांसाठी वारकरी संप्रदायातील हरिपाठ ऐकावा तसेच शाळांमध्ये विपश्यना केंद्र सुरू करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला.
मिलन म्हात्रे यांनी जागवल्या साथी गुलाबराव पाटील यांच्या आठवणी
दुसरे सत्कारमूर्ती मिलन म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी केले.
दरम्यान, स्मृती समारोहानिमित्त घेण्यात आलेल्या ‘साथी संदेश’ वक्तृत्व स्पर्धेत राज्यभरातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संभाजीनगरच्या प्रशांत चिंतामण बेले याने प्रथम क्रमांक पटकावला. समृद्धी संजय मोरणकर (मालेगाव) हिने द्वितीय, रुपेश जयंत पाटील (जळगाव) याने तृतीय, तर कल्याणी संदीप पाटील (अमळनेर) हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
साहित्य व नाट्य क्षेत्रातील प्रा. राजेंद्र देशमुख, कविवर्य बी. एन. चौधरी व संजय नेरकर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास संस्थेचे ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, ॲड. अशोक बाविस्कर, किरण पाटील, डॉ. शकील जलालोद्दीन शेख, भास्कर बोरसे, मगन पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील, सुनील पाटील, शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. धनगर, जे. एस. पाटील, मोनिका पाटील व शारदा उंबरकर यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी मानले.

