ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात पोलिसांचा रूट मार्च.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागांत रूट मार्च काढण्यात आला.
सकाळी १० ते ११.२० वाजेच्या दरम्यान हा रूट मार्च पार पडला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शहरातील विविध संवेदनशील भागांतून संचलन केले.

या रूट मार्चमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाच कंदील चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, पानखिडकी, वाडी चौक, कसाली डी.पी., आखाडा मकान, झामी चौक, पवन चौक, तिरंगा चौक तसेच गांधलीपुरा चौकी या प्रमुख भागांचा समावेश होता.

ईद-ए-मिलाद सणाच्या काळात शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, नागरिकांनी निर्भयपणे सण साजरा करावा आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा बसावा, या उद्देशाने पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. रूट मार्चच्या माध्यमातून पोलिस दलाची सज्जता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठीची तयारी यावेळी दिसून आली.
या रूट मार्चसाठी अमळनेर पोलीस ठाण्याकडील ६ अधिकारी व ४८ अंमलदार, मारवड पोलीस ठाण्याकडील २ अधिकारी व १५ अंमलदार, एरंडोल पोलीस ठाण्याकडील १ अधिकारी व १० अंमलदार, धरणगाव पोलीस ठाण्याकडील १ अधिकारी व ३ अंमलदार, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याकडील ३ अंमलदार, चोपडा शहर पोलीस ठाण्याकडील ३ अंमलदार, तसेच पोलीस मुख्यालयाकडील ३ दंगा नियंत्रण पथके आणि १ QRT पथक सहभागी झाले होते.
एकूण ११ अधिकारी आणि १२५ अंमलदारांचा या रूट मार्चमध्ये सहभाग होता. याशिवाय पोलीस मुख्यालय, जळगाव येथील बँड पथकही रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते.
सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून शहरातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी शांतता व सलोखा कायम ठेवून सण उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

