मुलींना इतर समाजात देणाऱ्यांवर बहिष्काराचा इशारा; आदिवासी संघटनांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : आदिवासी समाजातील मुली इतर समाजामध्ये देण्याच्या अथवा विकण्याच्या प्रकारांना विरोध दर्शवत, अशा कुटुंबांशी सामाजिक संबंध ठेवणार नसल्याचा इशारा आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. याबाबत अमळनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.


निवेदनात, आदिवासी समाजातील मुलगी इतर समाजात दिल्यास संबंधित कुटुंबाचा आदिवासी समाजाशी कोणताही संबंध राहणार नाही, तसेच ज्या समाजामध्ये मुलीचे लग्न करण्यात आले आहे, त्या समाजामध्येच संबंधित कुटुंबाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे समाजाच्या परंपरा व सामाजिक एकजूट धोक्यात आणणाऱ्या कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला.


दरम्यान, आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी नाशिक येथे उपोषणाला बसले असून, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांच्याही मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आगामी काळात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
यावेळी एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गुलाब बोरसे, अमळनेर तालुकाध्यक्ष भैय्या सोनवणे, रावण ग्रुपचे तालुकाध्यक्ष नरेश चव्हाण, अजय भाऊ, सागर भाऊ, एकलव्य संघटनेचे उपाध्यक्ष आबा बहिरम, अमळनेर तालुक्यातील वरिष्ठ कार्यकर्ते धनराज मालचे, ढेकू गावातील वरिष्ठ कार्यकर्ते रावसाहेब पवार, एकलव्य संघटनेचे जिल्हा सल्लागार विनायक सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते खैरनार दादा, पारधी समाजाचे कार्यकर्ते भुरा पारधी, नितीन भाऊ, राहुल भाऊ यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed